
समाजात क्रांती घडवायची असेल, तर कोणत्याही बंधनात न अडकता सत्याची बाजू मांडण्याचे धैर्य कलाकाराकडे असावे लागते. फक्त वाईट वास्तव मांडून किंवा अंधार दाखवून चालत नाही, तर कलेच्या माध्यमातून आशेचा दिवा पेटवणे आणि स्वतःच्याच विचारांच्या कोषातून 'मुक्त' होणे किती गरजेचे आहे, हाच या नाटकाचा मुख्य गाभा आणि संदेश आहे.
अभिराम या तरुण नाटककाराने लिहिलेल्या एका जळजळीत नाटकामुळे समाजात खळबळ माजते आणि एका संघटनेच्या धमकीमुळे त्याचे नाटक बंद पाडले जाते. या नैराश्यातून बाहेर पडत तो 'टर्निंग पॉईंट' म्हणून एका पुढार्याने (तात्यासाहेब) शिक्षिकेच्या मुलीवर (अलका) केलेल्या अत्याचाराची नवी कथा लिहितो आणि नाटकाचा शेवट नकारात्मक करतो.
पण, हा वाईट शेवट लिहिल्यावर त्याच्याच कल्पनेतील पात्रे (वसुधा, अलका, तात्यासाहेब, लंगड्या) जिवंत होऊन त्याला जाब विचारतात. ती त्याला जाणीव करून देतात की, लेखक म्हणून त्यानेच आपल्या लेखणीने त्यांच्यावर हा अत्याचार केला आहे. सुरुवातीला अभिराम समाजाचे दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो, पण पात्रे त्याला समजावतात की केवळ प्रश्न उभे करण्यापेक्षा कलेच्या माध्यमातून आशेचा किरण दाखवणे जास्त गरजेचे आहे. अखेर, पात्रांच्या वेदना समजून अभिराम स्वतःचा हट्ट सोडतो आणि अलकाला न्याय देणारा एक नवा, सकारात्मक शेवट लिहितो.