२०२५ समाजरंग वारी

Poster Image

बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे परदेशातील वारी पंढरीची !!!

तुम्हाला माहीतच आहे की दरवर्षी देहू व आळंदी येथून हजारो वारकरी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने, पंढरपूरच्या वारीला जातात.देहू/आळंदी ते पंढरपूर हे अंतर अंदाजे १५० मैलांचे आहे (अंदाजे २५० किलोमीटर) - हे अंतर वारकरी १९ दिवसात पूर्ण करतात.

उद्या १८ जून पासून तुकाराम महाराज पालखी ची सुरुवात होत आहे, तर १९ जून पासून ज्ञानेश्वर महाराज पालखी ची सुरुवात होत आहे. या वर्षी आषाढी एकादशी रविवार ६ जुलै रोजी आहे.

यावर्षी आपणही वारीच्या दरम्यान जेवढे जमेल तेवढे अंतर तेवढ्याच कालावधीत (१९ दिवस) पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ढोबळ मानाने दररोज २, ४, ६ किंवा ८ मैल चालले तर अनुक्रमे वारीचे २५, ५०,  ७५, किंवा १००% अंतर पूर्ण होईल. कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे चालूनही १००% अंतर पूर्ण करू शकतात. (उदाहरणार्थ: आई, वडील आणि दोन मुलांनी दररोज २ मैल चालले तरी एकत्रितरित्या वारीचे १००% अंतर पूर्ण होईल).

माऊलीचा जप किंवा संतांचे अभंग ऐकत ऐकत चालताना किंवा धावताना ठरलेले अंतर कधी पूर्ण होते ते कळत पण नाही.

या वारीच्या निमित्ताने आम्ही एक सामाजिक बांधिलकीचा प्रस्ताव घेऊन येत आहोत. त्यानुसार सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळाने महाराष्ट्रातल्या खालील ३ सामाजिक संस्थांसाठी निधीसंकलन (Fundraising) करायचे ठरवले आहे.

१) स्नेहवन (आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे राहणे, शिक्षण व संर्वागीण विकास यासाठी काम करणारी पुण्यातील संस्था / https://www.snehwan.in/home)
२) विद्यार्थी सहाय्यक समिती (ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील वसतिगृह / https://samiti.org/en/)
३) फुलोरा फाऊंडेशन (रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी कल्याणकारी योजना राबवणारी मुंबई मधील संस्था / https://fulorafoundation.org/contact-us/)

वरील निधीसंकलनाद्वारे खालील फायदे होतील. उदा. सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ २५, ५० किंवा १०० मुलांच्या वर्षभराच्या राहण्याची, शिक्षणाची, खाण्याची जबाबदारी घेऊ शकते.

तरी आम्ही आपल्याला वरील ३ पैकी एक किंवा अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करीत आहोत.

(वारीमध्ये भाग घेणाऱ्यांना ही मदत करणे बंधनकारक नाही आणि पूर्णपणे ऐच्छिक आहे)

नियमित व्यायाम केल्याने आरोग्याचे फायदे तर होतीलच, पण त्याचबरोबर एखाद्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावल्याने मानसिक समाधान पण मिळेल.

तर मंडळी आमच्या बरोबर या समाजरंग वारी मध्ये सहभागी होऊन स्नेहवन/विद्यार्थी सहाय्यक समिती/फुलोरा फाऊंडेशन संस्थेला मदत करणार ना?


आपले,
सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ